औरंगाबाद – मुस्लिम या देशाचे नागरिक आहेत की नाही अशी परिस्थिती गेल्या चार-साडेचार वर्षांत निर्माण झाली आहे. त्यांनी येथे राहावे की देश सोडून जावे, एवढे अत्याचार भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांवर होत आहेत. हे सरकार जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्यांनी मराठा आणि धनगर आरक्षणासोबतच मुस्लिमांनाही पाच टक्के आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी केली. त्यासोबतच त्यांनी आरक्षण न मिळाल्यास सरकारला खाली खेचण्याचा इशारा दिला आहे.
जनजागरण समिती महाराष्ट्रच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुस्लिम समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही असे विधान केले आहे. त्याला पवार यांनी विरोध केला. ते म्हणाले, ‘मागील सरकारने मुस्लिम समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर ५ टक्के आरक्षण दिलेले आहे. न्यायालयाने ही ते मान्य केलेले आहे. मग हे सरकार मुस्लिमांना आरक्षण का नाकारत आहे.’
भाजप सरकारची मुस्लिमांना आरक्षण देण्याची मानसिकताच नाही, अशी टिका करत पवार म्हणाले, ‘सरकारने हे स्पष्ट करावे की मुस्लिम या देशाचे नागरिक आहेत की नाही, नाहीतर आरक्षण देऊन सेक्युलर असल्याचे सिध्द करावे.’ मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली त्याचे आम्ही स्वागतच करतो. परंतु मुस्लिम समाजाचाही विचार सरकारने करावा, असे सांगत मुस्लिम समाज न्यायालयात याचिका दाखल करेल यामुळे सरकार देऊ इच्छित असलेले सर्वच समाजाचे आरक्षण रखडून पडतील, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला. ते म्हणाले, ‘सरकारला जर हे होवू द्यायचे नसेल तर १६ अधिक ५ हा फॉर्म्युला मराठा मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत कायम ठेवावा.’
मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण कसे देता येईल हे अधिक स्पष्ट करून सांगताना पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळून हिंदू धर्मातील ९० टक्के लोकांना आतापर्यंत आरक्षण मिळाले आहे. यामुळे मुस्लिम समाजाला सरसकट आरक्षण देण्यात काही अडचण नाही. यासाठी सरकारला दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे लागेल. जर सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले नाही तर आरक्षणाच्या मागण्या करणारे सर्व समाज एकत्र येऊन भाजप सरकारला त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा ही पवार यांनी यावेळी बोलताना दिला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, मुस्लिम धर्मातील मागास जातींना ओबीसी वर्गानुसार आधीच आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता संपूर्ण मुस्लिम समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, असे नुकतेच सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.















